Ad will apear here
Next
‘ग्लोबल चिपळूण’तर्फे ‘जलपर्यटन आणि क्रोकोडाइल सफारी’चे आयोजन
२२ ते २६ डिसेंबरदरम्यान साहसी क्रीडा प्रकारांची मेजवानी
वशिष्ठी बॅकवॉटर

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने २२ ते २६ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाइल सफारी २०१८’ हा महोत्सव आयोजित केला आहे. या दरम्यान सवतसडा धबधबा येथे रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंगसह एस. आर. जंगल रिसोर्ट येथे विविध साहसी क्रीडा प्रकारांची मजा लुटता येणार आहे. ‘क्रोकोडाइल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. या माध्यमातून चिपळूण आणि परिसरातील पर्यटनसमृद्धीचा सुगंध सर्वदूर पसरण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

वशिष्ठी नदीच्या किनारी पहुडलेल्या मगरी

याबाबतची माहिती संचालक धीरज वाटेकर, जिद्दी माउंटेनीअरिंगचे धीरज पाटकर यांनी पाच डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ ही चिपळूण पर्यटन विकासासाठी गेली सहा वर्षे कार्यरत असलेली मातृसंस्था आहे. या वेळी शाहनवाज शाह, संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, महेंद्र कासेकर, विलास महाडिक, मॅनेजर विश्वास पाटील, प्रल्हाद लाड उपस्थित होते. 


सन २०१४पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हा महोत्सव आयोजित केला जात असून, किमान सात ते आठ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या, सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्ठी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावा, अशी व्यवस्था या निमित्ताने करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत कोकणी खाद्य पदार्थांची रेलचेल, जुने भैरीमंदिर येथे पारंपरिक, सांस्कृतिक लोककला कार्यक्रम होणार आहेत. ‘क्रोकोडाइल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात खाडीतील वातावरण पर्यटकांनी गजबजणार आहे.

साहसी क्रीडा प्रकारांचे सहआयोजक जिद्दी माउंटेनीअरिंग असून, यात सवतसडा धबधबा येथे रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंगसह धामणवणे येथील एस. आर. जंगल रिसोर्ट येथे पॅरालल रोप, रोप बॅलन्सिंग, रायफेल शूटिंग, सॅक लाइन, ट्रेझर हंट आदी विविध साहसी क्रीडा प्रकार कार्यरत असणार आहेत. ‘जिद्दी’चे संस्थापक पाटकर यांच्यासह त्यांचे ११ सहकारी यासाठी मेहनत घेत आहेत. 

या महोत्सवाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यानंतर सलग पाच दिवस सकाळी ११ ते सहा या वेळेत विविध सहा सुशोभित नौकांच्या माध्यमातून जलपर्यटन व क्रोकोडाइल सफारीमध्ये खाडीकिनारी निवांत वाळूत पहुडलेल्या मगरींचे दर्शन, विविध जलचर आणि पक्ष्यांचे दर्शन घडणार असून, ही पर्यटक फेरी एक तासाची असेल. पर्यटकांना चिपळूण पर्यटन दर्शन आणि किल्ले गोविंदगडालाही भेट देता येईल. २५ डिसेंबरला सायंकाळी महोत्सवाचा समारोप आणि यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहोळा होईल. २६ रोजी आणि त्यानंतरही क्रोकोडाइल सफारी सुरू राहणार असून, पूर्वसूचना देऊन त्याचा पर्यटकांना लाभ घेता येईल. 

फेस्टिव्हल कालावधीत चिपळूण येथे येणाऱ्या पर्यटकांना चिपळूण आणि परिसरातील पर्यटन स्‍थळे पाहता यावीत यासाठी एक, दोन आणि तीन दिवसीय सहलीही आयोजित केल्या आहेत. यात प्रामुख्याने क्रोकोडाइल सफारी, परशुराम मंदिर, गोविंदगड किल्‍ला, बर्ड वॉचिंग, नेचरट्रेल यासह हेदवी दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिर, वेळणेश्‍वर मंदिर आणि बीच, गुहागर बीच, डेरवण शिवसृष्‍टी, श्रीक्षेत्र मार्लेश्‍वर, गणपतीपुळे, हर्णे-मुरूड बीच आदी पर्यटनस्‍थळे दाखविण्‍यात येणार आहेत. या सहली पर्यटकांच्या आग्रहास्तव कायमस्‍वरूपी कार्यरत ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना मान्यवर.

‘कोकणच्या निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या, आपल्या नियोजित नववर्ष आनंदोत्सवासाठी कोकणात येण्याचे नियोजन करीत असलेल्या राज्यभरातील पर्यटनप्रेमींनी चिपळूणातील या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवास उपस्थित राहून आपला नववर्षाचा आनंद द्विगुणीत करावा,’ असे आवाहन ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेचे अध्यक्ष रेडीज यांनी केले आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क : विश्वास पाटील- ९८२३१ ३८५२४, ७०५७४ ३४३१९.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZWVBV
Similar Posts
‘ग्लोबल चिपळूण’च्या बालचित्रकला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद चिपळूण : येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धांना शहरातील विविध शाळांतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २२ ते २६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होणाऱ्या बॅकवॉटर फेस्टिव्हल अॅंड क्रोकोडाइल सफारीच्या निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आली
विद्यार्थ्यांनी अनुभवला दाभोळ खाडीचा प्रवास चिपळूण : येथील मिरजोळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दलवाई हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने ‘वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता नऊ डिसेंबर २०१८ रोजी झाली. दिवसभरात विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध दाभोळ खाडीचा प्रवास अनुभवला आणि त्यातील
वसंत चिपळूणकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार चिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार वसंत लक्ष्मण चिपळूणकर यांना जाहीर झाला आहे. चिपळूणकर हे गाणे-खाडपोली औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल्स कंपनीतील इलेक्ट्रिकल विभागात काम करतात. त्यांनी उत्पादकता व गुणात्मकतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या अभ्यासू
‘हमीद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे’ चिपळूण : ‘महात्मा गांधींनंतर ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांचे विचार विचार करायला लावणारे असल्याने त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जीवनावरील माहितीपट तयार करत आहे,’ अशी माहिती दिग्दर्शिका व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिली. दलवाई यांच्या जीवनावरील माहितीपटासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language